Maharashtra Flood : यंदा देशात पावसाने उशिरा आगमन केले आहे. तरीही मागील काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. ठिकठिकाणी दरड कोसळून वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या अन्नाची समस्या उद्भवू लागली आहे. परंतु आता या आपत्तीमुळे निराधार झालेल्या कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले आहे. सरकारी आदेशानुसार प्रति कुटुंब १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ दिले आहे. त्याशिवाय ५ लिटर केरोसीन मोफत पुरविण्यास महसूल व वन विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. (Maharashtra Flood)
महसूल यंत्रणेकडून पात्र ठरविण्यात आलेल्या कुटुंबांनाच सदर अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्याकडून पात्र बाधित कुटुंबांच्या प्राप्त झालेल्या यादीनुसार मदत करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नवितरण अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप अधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याची माहिती वेळोवेळी सरकाराला द्यावी अशी सूचना दिली आहे.